VIDEO: चालत्या ट्रेनखाली आला तरुण, RPF जवानाने मृत्यूच्या जबड्यातून काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 01:21 PM2018-02-05T13:21:25+5:302018-02-05T13:24:26+5:30
आरपीएफ कर्मचा-याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे चालत्या लोकलखाली येणा-या एका तरुणाचा जीव वाचला आहे
मुंबई - आरपीएफ कर्मचा-याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे चालत्या लोकलखाली येणा-या एका तरुणाचा जीव वाचला आहे. नायगाव रेल्वे स्थानकावर एक तरुण ट्रेनखाली येणार होता, पण आरपीएफ जवानाने धाडस दाखवत धाव घेत त्याचा जीव वाचवला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. व्हिडीओत ट्रेन स्टेशनवरुन जाताना दिसत आहे. तेव्हा एक तरुण अचानक ट्रेनखली येतो. त्यावेळी आरपीएफ कर्मचारी तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतो. त्याचवेळी अजून एक व्यक्ती विरुद्ध दिशेने चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडते. आरपीएफ कर्मचारी त्याच्या दिशेने जात असतो, तितक्यात ती व्यक्ती उठून उभी राहते. नंतर आरपीएफ जवान तरुणाच्या दिशेने धावतो आणि त्याला खेचण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ट्रेन मात्र सुरु असते. ट्रेन सुरु असल्या कारणाने तरुण आतमध्ये खेचला जात असतो, पण आरपीएफ जवान त्याला घट्ट पकडून ठेवतो.
#WATCH Railway Protection Force personnel saves a boy from falling under a moving train at Naigaon railway station in Mumbai (2.2.18) pic.twitter.com/So8En2GkzI
— ANI (@ANI) February 5, 2018
तरुणाला वाचवण्यासाठी आरपीएफ जवान खाली जमिनीवर झोपून त्याचा हात घट्ट पकडून ठेवतो. त्यावेळी तिथे स्टेशनवर उपस्थित प्रवासीही जवानाच्या मदतीसाठी धाव घेतात. जवळपास 25 सेकंद आरपीएफ जवान तरुणाला त्याच स्थितीत पकडून ठेवतो. अखेर तरुणाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आणण्यात आरपीएफ जवानाला यश मिळतं. ही घटना 2 फेब्रुवारीची आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा अजून वाढवण्यात आली आहे. मुंबईमधील रेल्वे स्थानकांवर अशा घटना अनेकदा घडत असतात. चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात अनेकदा प्रवासी आपला जीव धोक्यात घालत असतात.