मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने दलालांविरूद्ध कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 06:24 PM2020-07-23T18:24:38+5:302020-07-23T18:25:15+5:30
४४ दलालांना पकडून ८ लाखांहून अधिक किंमतीचे तिकिटे जप्त
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजाराचा रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम राबविली आहे. या मोहिमेत
४४ दलाल पकडण्यात आले आहे. दलालांकडून ८ लाख ६२ हजार १९१ किंमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त केली आहेत. रेल्वे सुरक्षा बलाने सायबर सेलचा वापर करून अनधिकृत ई-तिकिटे जप्त केली आहेत.
रेल्वेने १२ मेपासून ३० फेऱ्या वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या. त्यानंतर १ जून रोजी निवडक विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या २०० फेऱ्या घोषणा केली. यामध्ये
अनेक वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्यात असून या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी दाखल होऊ लागल्या. दलालांविरूद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले. यातून ८ लाख ६२ हजार १९१ किंमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त केली आहेत. लॉकडाऊन काळात मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाच्या मुंबई विभागात २२ दलाल पकडले. त्यांच्याकडून ६ लाख ९ हजार २९८ किंमतीची ३२८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळातील आरपीएफ ठरले कोरोना योद्धा : रेल्वे मालमत्तेचे रक्षण करणे. अडकलेल्या प्रवाशांना अन्न पॅकेटचे वितरण करणे. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटूंबियांशी पुन्हा भेट घालून देण्याचे काम, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहका-यांसाठी नाविन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.