Join us

फेरीवाल्यांपुढे आरपीएफही हतबल

By admin | Published: January 10, 2017 7:11 AM

मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे फेरीवालामुक्त करण्याचे नियोजन आखले जात असतानाच पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने

मुंबई : मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे फेरीवालामुक्त करण्याचे नियोजन आखले जात असतानाच पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मात्र फेरीवाल्यांसमोरच गुडघे टेकले आहेत. रेल्वे पूर्णपणे फेरीवालामुक्त करणे अशक्य असल्याची धक्कादायक कबुलीच पश्चिम रेल्वे आरपीएफचे विशेष महानिरीक्षक आणि मुख्य सुरक्षा आयुक्त उदय शुक्ला यांनी पत्रकार परिषदेतच दिली. फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, मात्र त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य नाही. त्यासाठी निश्चित असे धोरण ठरवावे, असे मतही त्यांनी मांडले. रेल्वे हद्दीत आणि ट्रेनमध्ये अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावरही फेरीवाल्यांकडून बस्तान मांडले जाते. त्यातच एखाद्या फेरीवाल्याला हटकल्यास त्याच्याकडून प्रवाशांवरच अरेरावी केली जात असल्याचे प्रसंग घडतात. अनधिकृत फेरीवाल्यांवर आरपीएफकडून दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र कारवाई केल्यानंतर पुन्हा फेरीवाले ठाण मांडून धंदा करताना दिसतात. फेरीवाल्यांवर नियंत्रण का ठेवू शकत नाही याबाबत शुक्ला यांना विचारले असता, रेल्वे फेरीवालामुक्त करण्यासाठी अजून रेल्वेकडे क्षमता नाही. फेरीवाल्यांना पूर्णपणे अटकाव करणे अशक्य आहे. तरीही त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. रेल्वे सुरक्षा दलाकडे कमी असलेले मनुष्यबळ आणि दंडाची कमी असलेली रक्कम त्यामुळेही फेरीवाल्यांवर नियंत्रण आणता येत नसल्याची कबुली त्यांनी दिली. मुंबईतील रेल्वे स्थानकांत फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आणि आरपीएफकडून मुंबई पालिका आयुक्तांना पत्र लिहून त्यावर धोरण ठरविण्याचे आवाहन केल्याचे शुक्ला यांनी सांगितले. (प्रतिनिधी)