स्टंटबाजांविरुद्ध आरपीएफची ‘गांधीगिरी’
By admin | Published: July 11, 2016 05:23 AM2016-07-11T05:23:48+5:302016-07-11T05:23:48+5:30
रेल्वे अपघातांमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. मरण पावणाऱ्या प्रवाशांमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा समावेश अधिक आहे
मुंबई : रेल्वे अपघातांमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. मरण पावणाऱ्या प्रवाशांमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा समावेश अधिक आहे. अनेकदा कारवाई करूनदेखील स्टंटबाजी कमी झालेली नाही. त्यामुळे आरपीएफ पोलिसांनी थेट ‘गांधीगिरी’चा मार्ग अवलंबला आहे. गोवंडी रेल्वे स्थानकात स्टंटबाजांचे फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तरी हे तरुण स्टंटबाजी करणे थांबवतील, अशी आशा आरपीएफच्या जवानांना वाटत आहे.
मुंबईतील लोकलला प्रत्येक वेळेत सध्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. घाईत लोकल पकडत असताना लोकलमधून पडून अनेक प्रवाशांना प्राण गमावावे लागले आहे. रेल्वे रूळ ओलांडतानादेखील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अशातच अनेक तरुण लोकलच्या टपावरून प्रवास करत स्टंटबाजी करत असल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्टंटबाजी करताना टपावरून पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत रेल्वे पोलीस आणि आरपीएफने अनेकदा मोठ्या कारवाया केलेल्या आहेत. मात्र, स्टंटबाजांचे प्रमाण कमी झालेले नाही. गोवंडी-मानखुर्द ते कुर्ला या स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात तरुण लोकलच्या टपावरून प्रवास करतात. त्यामुळे विजेचा शॉक लागून अथवा चालत्या लोकलमधून पडून अनेक तरुणांचा या स्थानकांदरम्यान मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)