आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 08:33 AM2024-10-25T08:33:31+5:302024-10-25T08:34:09+5:30
जागावाटपामध्ये पक्षाला सन्मानजनक वागणूक नसल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुती जागावाटपामध्ये पक्षाला सन्मानजनक वागणूक देत नाही, असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) कार्यकर्त्यांनी गुरुवारी महायुती विरोधात आंदोलन केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले निर्णय घेत नाहीत तोपर्यंत महायुतीचा प्रचार करणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे, सचिव परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जागा वाटपात पक्षावर महायुती अन्याय करत आहे. सन्मानजनक जागावाटप होत नाही तोपर्यंत महायुतीचा प्रचार करणार नाही. दोन दिवस वाट पाहू. त्यानंतर महायुती की महाविकास आघाडीचा प्रचार करायचा याचा निर्णय घेऊ, असे कासारे यांनी यावेळी सांगितले.