आरआर मंडळाचे खरे भाडेकरू बेपत्ता
By admin | Published: July 20, 2015 01:25 AM2015-07-20T01:25:13+5:302015-07-20T01:25:13+5:30
म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (आरआर) अखत्यारीत असलेल्या उपकर प्राप्त इमारतींमधील भाडेकरूंना मंडळामार्फत काढण्यात आलेल्या
मुंबई : म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (आरआर) अखत्यारीत असलेल्या उपकर प्राप्त इमारतींमधील भाडेकरूंना मंडळामार्फत काढण्यात आलेल्या सोडतीत घर मिळाल्यानंतरही त्यांनी अद्यापही घराचा ताबा घेतलेला नाही. या भाडेकरूंकडून म्हाडाने सद्य:स्थितीतील निवासी पत्ते आणि दस्तावेज मागविले असून, ३ आॅगस्टपर्यंत भाडेकरूंनी माहिती न दिल्यास या भाडेकरूंचा घरावरील हक्क संपुष्टात येईल, असा इशारा आऱ आऱ मंडळाने दिला आहे.
जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीची व पुनर्रचना करण्याची जबाबदारी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची आहे. त्यानुसार उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांना इमारतीच्या दुरुस्तीमुळे इतरत्र हलविण्यात येते. त्यानुसार फोर्ट बोरा बाजार येथील काही रहिवाशांना इतरत्र घर देण्यात आले. यानंतर आर आर मंडळाने २00९ आणि २0१३ मध्ये भाडेकरूंच्या घराची सोडत काढली होती. या सोडतीमध्ये घर मिळाल्यानंतर अद्यापही या भाडेकरूंनी घराचा ताबा घेतलेला नाही. या भाडेकरूंच्या नावाची यादीही म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.