अनियमिततेमुळे पीएच.डी.च्या विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : वर्षातून किमान तीनदा बैठक घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठात आरआरसीची (रिसर्च अँड रिकग्निशन कमिटी) बैठक सध्या वर्षातून फक्त एकदाच होत असल्याने संशोधन व पीएच.डी. करणाऱ्या विद्यर्थ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. वर्षातून एकदा होणारी ही बैठकही अनिश्चित असते. त्यामुळे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक महिने बैठक कधी लागेल याची वाट पाहावी लागते आणि मग काही जण अर्ध्यावरच पीएच.डी. सोडतात. यामुळे केवळ विद्यर्थ्यांचेच नाही तर देशाच्या संशोधन वृत्तीला खीळ बसत असल्याचा आरोप युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केला. मुंबई विद्यापीठ प्रशासनानाने वर्षातून किमान ३ वेळा आरआरसीची बैठक लावावी, अशी मागणी त्यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन विषयाला आणि संशोधनाला वेळोवेळी मान्यतेची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे आरआरसीची बैठक होणे आवश्यक असते. त्याचसोबत या कमिटीमध्ये असणारे सदस्य हे यूजीसीच्या नियमाप्रमाणे नियुक्त केलेले असावेत अशी मागणी थोरात यांनी केली आहे. आरआरसीचे सदस्यांची निवड असताना मर्जीतल्या लोकांची निवड होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यात अडचणी येतात. यामुळे आरआरसीचे सदस्य स्वतः गाइड (मार्गदर्शक) असणे आवश्यक आहे. आरआरसीपुढे पीएच.डी.च्या विद्यर्थ्यांच्या विषयांची मंजुरी, रेफ्रीची निवड, गाइडची नियुक्ती करणे अशा अनेक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी असते. या सर्व कारणास्तव आरआरसीची बैठक महत्त्वाची असते आणि तेथील सदस्यांची नियुक्ती ही योग्य पद्धतीने होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
.................