Join us

दहा लाख रुपयांचे ‘एशियाटिक’ला अनुदान, दुर्मीळ ग्रंथांचे होणार डिजिटायजेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 6:02 AM

या अनुदानाविषयीचा शासन निर्णय नुकताच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. 

मुंबई :  एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईला दुर्मीळ हस्तलिखिते, दुर्मीळ ग्रंथ यांचे डिजिटायजेशन करण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. एशियाटिक सोसायटी ही २०० वर्षांपूर्वीची संस्था आहे. या संस्थेत अनेक दुर्मीळ ग्रंथ आणि हस्तलिखिते असून पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेल्या अनुदानाच्या वेळी डिजिटायजेशनचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला होता. या अनुदानाविषयीचा शासन निर्णय नुकताच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. 

त्याप्रमाणे यापूर्वीही सोसायटीला या प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात आल्याचे निर्णयात जाहीर केले आहे. निर्णयात नमूद केल्यानुसार, एशियाटिक सोसायटीने या प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाचा अहवाल ग्रंथालय संचालनालयाच्या संचालकांना सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्या संचालकांनी संस्थेने केलेल्या कामाचा आढावा शासनास सादर करण्यात यावा, असे म्हटले आहे. या संस्थेत साडेतीन लाखांपेक्षा अधिक पुस्तकांचा अमूल्य खजिना आहे. २०० वर्षांपूर्वीची पुस्तके, त्यातही १५ हजार दुर्मीळ पुस्तके आहेत.

पर्शियन, पाली, संस्कृत, ग्रीक, लॅटिन, इटालियन, जर्मन आणि फ्रेंच या युरोपियन भाषांमधील प्राचीन, दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह आहे. बायोग्राफी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, व्यवस्थापन, पर्यटन आणि फिक्शन यावरील पुस्तकांचा समावेश आहे. २०० वर्षांपेक्षा जुनी नियतकालिके, वर्तमानपत्रे इथे आहेत. अनेक जगप्रसिद्ध पुस्तकांची पहिली आवृत्ती इथे ठेवली आहे.   जवळपास १३०० प्राचीन नकाशे, ३००० दुर्मीळ हस्तलिखिते, संस्कृत, पाली आणि पर्शियन भाषेत ताडपत्रावरील लिखाण इथे आहे.

टॅग्स :मुंबई