संकटग्रस्त मच्छिमारांना एक हजार कोटींची मदत करा, महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 09:19 PM2019-11-05T21:19:00+5:302019-11-05T21:19:20+5:30
नैसर्गिक वादळे व अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील मच्छिमारांना राज्य शासनाने 1000 कोटींची आर्थिक मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने राज्य शासनाकडे केली आहे.
मुंबई - नैसर्गिक वादळे व अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील मच्छिमारांना राज्य शासनाने 1000 कोटींची आर्थिक मदत करा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने राज्य शासनाकडे केली आहे. समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्यव्यसाय आयुक्त राजीव जाधव यांची समितीच्या शिष्टमंडळाने काल भेट घेतली. गेल्या तीन महिन्यात पासून नैसर्गिक वादळे व अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांना शेतक-यां प्रमाणे राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याची आग्रही मागणी केली.
महाराष्ट्रच्या 720 कि.मी. सागरी समुद्रात गेल्या दि,1 ऑगस्ट पासून मासेमारी हंगामा सुरू झाला. परंतू अतिवृष्टी व सतत होणा-या वादळांमुळे किमान 90 दिवसाचा हंगामा वाया गेला आहे. दि 01 जून ते 31 जुलै हा 61 दिवसाचा मासेमारी बंद काळावधीनंतर पिक मासेमारी हंगामात नैसर्गिक आपत्ती मुळे मच्छिमार हवालदील झाला आहे. सतत तीन महिने मासेमारीसाठी गेलेल्या नौका सतत परत बोलविल्यामुळे प्रत्येक फेरीचे डिझेल, बर्फ इत्यादी सामान सामुग्रीचे तसेच खलाशी मेहनताना यांचे किमान 1000 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या निदर्शनास यावेळी आणून दिले. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या मच्छिमारांचे किमान 1000 कोटींचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, थकीत डिझेल तेलावरील परतावा तात्काळ मिळावा, चित्रा खलिजा जहाज अपघाताचे पैसे त्वरीत मिळावे अश्या विविध मागण्या यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने यावेळी केल्या.
राजीव जाधव यांनी मत्स्यतज्ञांची तसेच इतर संबंधित कार्यालयाचे अहवाल घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत होईल असा अहवाल तयार करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.तसेच डिझेल तेलावरील प्राप्त रू.48/- कोटींच्या सबसिडीचे वाटप लवकर करण्याचे आदेश दिले. तसेच चित्रा खलिजा जहाज अपघात बाबत आजच न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्याचे मत्स्यव्यवसाय खात्याचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना आदेश दिले.
या शिष्टमंडळात लिओ कोलासो,कार्याध्यक्ष मा. रामकृष्ण तांडेल,सरचिटणीस किरण कोळी,चिटणीस मोरेश्वर वैती,फिलिप मस्तान, उपाध्यक्ष राजन मेहेर, उपाध्यक्ष मो.ना.पाटील,खजिनदार रमेश मेहेर, मुंबई जिल्हा अध्यक्ष परशुराम मेहेर,ठाणे/पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर,मुंबई महिला जिल्हा संघटक.उज्वला पाटील,सदस्य जयेश भोईर, सदस्य विजय थाटू आदी मान्यवर उपस्थित होते.