Join us

अष्टविनायकची मराठी नाट्य व्यवस्थापक संघाला १,२५,००० रुपये मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 8:26 PM

अशोक सराफ व निर्मिती सावंत यांच्या हस्ते मराठी नाट्य व्यवस्थापक संघाला दिला धनादेश

मुंबई - आजवर पुलवामा हल्ला, कोल्हापूर पूरग्रस्त तसेच इरशाळ वाडी पीडितांना मदत करणाऱ्या अष्टविनायक या मराठी नाट्य निर्मिती संस्थेने गरजवंतासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे केला आहे. व्यावसायिक नाटकांचे व्यवस्थापन सांभाळणार्‍या व्यवस्थापकांच्या मराठी नाट्य व्यवस्थापक संघ, मुंबई या संस्थेला अष्टविनायकने १,२५,०००/- रुपयांची मदत केली आहे.  मराठी नाट्य व्यवस्थापक संघ, मुंबई ही व्यावसायिक नाटकांचे व्यवस्थापन सांभाळणार्‍या व्यवस्थापकांची एक संघटना आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नाट्यप्रयोगाचे व्यवस्थापन हे व्यवस्थापक करीत असतात. अशा या संस्थेच्या मदतीकरिता अष्टविनायक नाट्य संस्थेने आज नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता विले पार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात 'व्हॅक्युम क्लिनर' या गाजलेल्या मराठी नाटकाच्या प्रयोगाचे  आयोजन केले होते. या प्रयोगाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रयोगातून जमा झालेल्या रकमेपैकी मराठी नाट्य व्यवस्थापक संघाला रुपये एक लाख पंचवीस हजार रुपयांचा  (१,२५,०००) धनादेश ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ व निर्मिती सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. यानंतर व्यवस्थापक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अष्टविनायक नाट्य संस्थेचे निर्माते दिलीप जाधव व नाटकातील कलाकार अशोक सराफ व निर्मिती सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच 'व्हॅक्युम क्लिनर'च्या संपूर्ण टीमचे आभार मानले. मराठी नाट्य व्यवस्थापक संघाचे अध्यक्ष प्रणित बोडके, उपाध्यक्ष दीपक गोडबोले, प्रमुख कार्यवाह  जगदीश शिगवण, कोषाध्यक्ष नितीन नाईक, सहकार्यवाह प्रविण दळवी, तसेच निर्माते व  व्यवस्थापक संतोष शिदम, नितीन नाईक, शेखर दाते इत्यादी मंडळी यावेळी उपस्थित होती.

टॅग्स :मुंबईअशोक सराफ