Mumbai: रोख सव्वा कोटी रुपये, दागिने अन् बरेच काही, सापडले घबाड, सीबीआयकडून गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 07:39 AM2023-04-21T07:39:22+5:302023-04-21T07:39:53+5:30
Crime: उत्पन्नापेक्षा तब्बल ८८ टक्के अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गेल कंपनीच्या वितरण विभागाचे माजी संचालक आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात बुधवारी सीबीआयच्या दिल्ली येथील मुख्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : उत्पन्नापेक्षा तब्बल ८८ टक्के अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गेल कंपनीच्या वितरण विभागाचे माजी संचालक आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात बुधवारी सीबीआयच्या दिल्ली येथील मुख्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ई. एस. रंगनाथन असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. यांच्याविरोधात अवैध संपत्ती गोळा केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापेमारी केली. त्यावेळी त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी केली असता त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावे पाच स्थावर मालमत्ता असल्याचे आढळून आले. याखेरीज १ कोटी २९ लाख रुपयांची रोख रक्कम, दागिने, परकीय चलन, अनेक बँकांत त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली खाती व त्यात असलेले पैसे असे घबाड सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आढळले. रंगनाथन यांच्या कार्यकाळात त्यांचे वेतन आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती याचे गणित मांडले असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ टक्के अधिक मालमत्ता असल्याचे दिसून आले. या मालमत्तेचा कोणताही ठोस तपशील रंगनाथन यांना चौकशीदरम्यान देता आला नाही.
१९८५ साली गेल कंपनीमध्ये नोकरीला लागलेले रंगनाथन २०१६ ते २०२० या कालावधीदरम्यान इंद्रप्रस्थ गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यानंतर २०२० मध्ये गेल कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्याकडे देशभरातील वितरणाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. याप्रकरणी रंगनाथन यांच्यासोबत त्यांची पत्नी
व्ही. एन. मीनाक्षी यांच्याविरोधात देखील सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.