Join us  

१५ रुपये लिटर इथेनॉलवर चालणारी कार ऑगस्टमध्ये, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 6:07 AM

गडकरी म्हणाले की, बायोइथेनॉलवर चालणारी ही गाडी प्रदूषणशून्य असेल. त्यापाठोपाठ अशा स्कूटरही बाजारात येतील. भविष्यात ट्रक, ट्रॅक्टरसह सगळी वाहने  इथेनॉलवर धावतील.

मुंबई : येत्या ऑगस्टमध्ये टोयाटो कंपनी ही १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणारी चारचाकी गाडी लाँच करणार असून त्यात केवळ १५ रुपयात एक लिटर इंधन उपलब्ध होईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे केली. देशातील मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी भाजपने विशेष महाअभियान चालविले आहे. याअंतर्गत शुक्रवारी मुंबईत उद्योजक आणि आर्थिक क्षेत्रातील मंडळींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला गडकरी यांनी संबोधित केले. गडकरी म्हणाले की, बायोइथेनॉलवर चालणारी ही गाडी प्रदूषणशून्य असेल. त्यापाठोपाठ अशा स्कूटरही बाजारात येतील. भविष्यात ट्रक, ट्रॅक्टरसह सगळी वाहने  इथेनॉलवर धावतील. आजपासून पाच वर्षांत भारत ऑटोमोबाइल उत्पादनात जपानला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकावर असेल.

हे श्रेय ना मोदींचे ना माझे, जनतेने हा बदल केलाजी विकासकामे  काँग्रेसने ६० वर्षात केली नाही ती आमच्या सरकारने ९ वर्षात केली. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही आणि माझेही नाही. या व्यासपीठावर बसलेल्या कोणत्याही नेत्याचे पण नाही.  याचे श्रेय देशातील जनतेचे आहे. देशातील जनतेने केलेला बदल, त्यांनी आमच्यावर (भाजप) ठेवलेला विश्वास आणि  जनतेच्या पाठिंब्यामुळेच देशात बदल झाला आहे. नऊ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर होता, खरा चित्रपट अजून यायचा आहे, असेही गडकरी म्हणाले.

बेस्टच्या सेवेत सगळ्या बस इलेक्ट्रिक हव्यातमुंबईत बेस्टच्या बससाठी एका किलोमीटरमागे ११५ रुपये खर्च येतो. इलेक्ट्रिक बस असेल तर हाच खर्च केवळ ४१ रुपये (एसी) येतो. त्यामुळे मुंबईत सर्व बस इलेक्ट्रिक असतील तर बेस्टला मोठा फायदा होईल, असे गडकरी म्हणाले.

मुंबईहून सी-प्लेन लवकरच!गडकरी म्हणाले की, यापूर्वी मी गिरगाव चौपाटी (मुंबई) येथे आम्ही सी-प्लेनही उतरवले होते. हे विमान जमिनीवर आणि पाण्यावरही उतरू शकते. त्यामुळे तो दिवस दूर नाही जेव्हा मुंबईहून उदयपूरला जावे लागेल तेव्हा सी प्लेनमध्ये बसून थेट उदयपूरच्या तलावात उतरता येईल. उदयपूरच्या तलावातून विमानाने थेट कोलकाता गाठणे शक्य होईल.

टॅग्स :नितीन गडकरी