मुंबई - शहरात काही ठिकाणी देण्यात आलेल्या एलेव्हेटेड मल्टिलेव्हल इलेक्ट्रोमेकॅनिकल कारपार्किंग सिस्टम कंत्राट प्रक्रियेत महापालिकेचे २०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली आहे.
मेसर्स सोटेफिन पार्किंग कंपनीचे दिल्लीतील पार्किंग कंत्राट प्रतिवाहन ७ लाख ते १७ लाख, तर मुंबईत मात्र २२ लाख ते ४० लाख असे आहे. कंपनीच्या मुंबई आणि दिल्ली कंत्राटातील विसंगती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निदर्शनास आणली आहे.
या कंपनीने दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात २६४ कार पार्किंगचे काम ४४.७१ कोटींत केले आहे. त्यात प्रतिकार खर्च १६.९४ लाख आहे. याच शहरात जीपीआरए येथे ३०० कार पार्किंगचे काम २१.१८ कोटीत केले आहे. महापालिकेने कंपनीला कार्यादेश दिलेल्या कंत्राटात माटुंगा, फ्लोरा फाउंटन आणि वरळीचा समावेश आहे. फ्लोरा फाउंटन (विशाल कन्स्ट्रक्शन) येथे ७० कोटींत १७६ कार पार्किंगचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यात प्रतिकार खर्च ३९.७७ लाख आहे.
माटुंगा (रेलकोन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट) येथे ४७५ कार पार्किंगचे काम १०३.८७ कोटींना देण्यात आले असून, प्रति कार खर्च २१ लाख आहे. मालवणी येथे एमएमआरडीएचे ६६९ कार पार्किंगचे काम १५० कोटीला देण्यात आले असून, तेथे हा खर्च प्रति कार २२.४२ लाख आहे, अशी आकडेवारी गलगली यांनी प्रसृत केली आहे. वरळी (श्री इंटरप्रायझेस) येथे ६४० कार पार्किंगचे काम २१६.९४ कोटींना देण्यात आले असून, प्रतिकार खर्च ३३.९० लाख आहे.
महापालिकेने बोलीच्या किमतीचे मूल्यमापन नीट केले नाही, दरांचे विश्लेषणही केले नाही किंवा देशभरातील या प्रकल्पांच्या किमती विचारात घेतल्या नाहीत. ज्या कंत्राटदारांना कामे दिली आहेत, त्यांनी हीच कामे अन्य प्राधिकरणांसाठी कमी दरात केली आहेत. - अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते