Join us  

प्रवीण दरेकरांकडून मुंबई बँकेत दोन हजार कोटींचा घोटाळा; भाई जगताप यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 7:22 AM

दरेकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्याबरोबरच या तिघांनी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा सहकारी बँकेत सहा वर्षांत दोन हजार कोटींचा घोटाळा केला.  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातले होते, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत  केला. दरेकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्याबरोबरच या तिघांनी नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरेकर यांनी  २०१३-१४ ते २०१९-२० या कालावधीत   घोटाळा केल्याचे सांगत जगताप म्हणाले की, दरेकर यांना पाठीशी घालणारे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री   फडणवीस आणि सहकार मंत्री  चंद्रकांत पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून  कारवाई करावी. तर मजूर म्हणून नोंद असलेले   दरेकर यांच्या २००० कोटींचा घोटाळा  सहकार विभागाच्या चौकशी अहवालामध्ये  उघड झाला आहे. दरेकर यांची ज्या प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थेत मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे ते कागदोपत्री रंगारी मजूर असल्याचे दिसते. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंदणी असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते.प्रवीण दरेकर यांना २३ मार्चपर्यंत दिलासा  मुंबई : बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांची सुनावणी २३ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  त्यामुळे दरेकरांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.सत्र न्यायालयात सुनावणी सुरु असलेल्या याप्रकरणात राज्य सरकारने  विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान प्रदीप घरत यांनी वकीलपत्र सादर केले. राज्य सरकारकडून या प्रकरणात लेखी उत्तर सादर करण्यात आले असून, युक्तिवादाकरिता वेळ मागितल्याने न्यायालयाने या प्रकरणावरील पुढील सुनावणी २३ मार्चला ठेवली आहे. तसेच  तोपर्यंत  कोणतीही कारवाई  न करण्याचे आदेश कायम ठेवण्यात आले.

टॅग्स :प्रवीण दरेकरअशोक जगताप