ठाणे : उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यात अपयश आल्याने कळवा रुग्णालय राज्य सरकारच्या ताब्यात देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असतानाच बुधवारी सादर करण्यात आलेल्या मूळ अंदाजपत्रकात या रुग्णालयाच्या देखभालीसाठी २३ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने हे रुग्णालय चालविण्यासाठी घेतले तर या निधीचे काय करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था सरकारने ताब्यात घेऊन चालवाव्यात, असा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. असे असतानाही कळवा रुग्णालयाच्या देखभाल, दुरुस्ती आणि इतर बाबींसाठी २०१५-१६ च्या मूळ अंदाजपत्रकात २३ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. कळवा रुग्णालयात ५०० खाटांची सुविधा आहे. येथे रोज ५०० च्या आसपास रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. परंतु, सध्या या रुग्णालयासह राजीव गांधी वैद्यकीय रुग्णालयाची परिस्थिती फारच खालावली आहे. तसेच यासाठी १०३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो करता येणे शक्य नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णालय, महाविद्यालय आणि परिचारिका प्रशिक्षण संस्थेसह मौजे खारी येथील हॉस्पिटलसाठीचा भूखंडदेखील सरकारने ताब्यात घेऊन तेथे रुग्णालय उभारावे, असा प्रस्ताव ठामपाने तयार केला आहे. (प्रतिनिधी)रुग्णालय सरकारने चालवावे म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु, त्याला मंजुरी मिळेल की नाही, याबाबत आताच सांगणे कठीण आहे. तसेच हा प्रस्ताव पूर्वीच महासभेने मंजूर केला आहे. त्यानुसार याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.- संजीव जयस्वाल, आयुक्त अंदाजपत्रकात विविध कामांसाठी तरतूद अंदाजपत्रकात रुग्णालयात तळ मजल्यावरील बाह्यरुग्ण विभाग, पहिल्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता कक्ष, रुग्णालयाचे वॉर्ड्स इत्यादींच्या नूतनीकरणाचे नियोजन आहे. तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या गच्चीवर वॉटर प्रूफिंग, इमारतीचे नूतनीकरण आदी कामेही प्रस्तावित आहेत. यासाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आयसीयूजवळ एक नवीन लिफ्ट, शवागारासाठी अद्ययावत कोल्ड स्टोरेज रूम व विद्युतकामांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कळवा रुग्णालयासाठी २३ कोटींची तरतूद
By admin | Published: February 20, 2015 1:31 AM