मुंबई : गावाकडे असलेले आपले सात माणसांचे कुटुंब चालवण्याची जबाबदारी पेलताना नातीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिक्षा चालविणाऱ्या देसराज जोद सिंग यांना मदतीचा हात मिळत आहे. अनेक दानशूर व्यक्तिंनी त्यांना आतापर्यंत २४ लाख रुपये मदत म्हणून दिले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत नातीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मेहनत करणाऱ्या देसराज यांची ही कहाणी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. तसेच ती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना मदतीची तयारी दाखविली. एका फेसबुक यूजरने देसराज यांच्या मदतीसाठी पैसे जमा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आपल्या नातीला शिकवण्यासाठी देसराज यांनी आपले राहाते घरेही विकले होते. ते गेल्या दोन दशकांपासून रिक्षालाच स्वतःचे घर बनवून त्यात राहात आहेत. ते खारदांडा परिसरात रिक्षा चालवतात.
देसराज यांची ही करुण कहाणी ऐकून अनेक जण व्यथित झाले आणि त्यांच्या मदतीसाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत आतापर्यंत २४ लाख रुपये देसराज यांना बक्षिसाच्या स्वरुपात मिळाले आहेत. सोशल मीडियावर ह्युमन्स ऑफ बॉम्बे नावाच्या पेजवर या आजोबांची कहाणी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर देसराज प्रचंड व्हायरल झाले.