एटीएममधून लांबवली ३८ लाखांची रोकड
By admin | Published: May 18, 2017 12:40 AM2017-05-18T00:40:52+5:302017-05-18T00:40:52+5:30
एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानेच रोकड भरल्यानंतर पिन नंबरचा गैरवापर करून, पाच एटीएममधील ३८ लाख ६० हजार रुपये चोरल्याची
- लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानेच रोकड भरल्यानंतर पिन नंबरचा गैरवापर करून, पाच एटीएममधील ३८ लाख ६० हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना बुधवारी डोंबिवलीत उघडकीस आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनीचा कर्मचारी राकेश पवार याच्यासह त्याचे साथीदार नयन भानुशाली आणि ज्योतिष गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ते पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सध्या नोटांच्या टंचाईमुळे एटीएममध्ये खडखडाट असल्याने खातेधारक त्रस्त आहेत. त्यातच डोंबिवलीत एटीएममधील रोकड चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवली, दिवा, आगासन, सोनारपाडा, कोळेगाव आणि गोळवली येथील बँकांच्या एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम ‘रायटर सेफगार्ड’ या कंपनीमार्फत केले जाते. या कंपनीची डोंबिवली (पूर्व) परिसरातील सोनारपाडा येथे शाखा आहे. आरोपी राकेश पवार हा दोन महिन्यांपूर्वीच तेथे कामाला लागला होता. कंंपनीने राकेशला सोमवारी रात्री एटीएम मशिनमध्ये पिन नंबरद्वारे पैसे भरण्यास दिले होते. त्यानुसार राकेश, सुरक्षारक्षक आदींनी पासवर्ड आणि सिक्रेट कोडद्वारे एटीएममध्ये पैसेही भरले. मात्र, रात्री काही वेळानंतर राकेश हा नयन आणि गुप्ता यांच्यासह या एटीएममध्ये परतला.
या त्रिकुटाने राकेशकडील पिन नंबरच्या आधारे पाच एटीएममधील ३८ लाख ६० हजार रु पये काढून लंपास केले. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार एटीएममध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा सारा प्रकार समजताच ‘रायटर सेफगार्ड’ कंपनीचे मॅनेजर संदीप मिसाळ यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, तिघांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.
राकेश, नयन आणि ज्योतिष यांना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके मुंबई आणि कणकवली येथे रवाना झाली आहेत. या तिन्ही आरोपींना लवकरच पकडले जाईल, असा विश्वास तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे यांनी व्यक्त केला.