Join us

कोविड खर्चासाठी मार्च २०२१ पर्यंत चारशे कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला असला तरी अद्याप संकट टळले नाही. यासाठी मार्च २०२१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला असला तरी अद्याप संकट टळले नाही. यासाठी मार्च २०२१ पर्यंत आणखी चारशे कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्याची विनंती प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. मात्र आतापर्यंतच्या खर्चाचा हिशेब येईपर्यंत हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्याची उपसूचना भाजपने मांडली. परंतु, सत्ताधारी शिवसेनेने यावर मतदान घेत चारशे कोटी खर्चाला मंजुरी दिली. मतदानात शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची मते समान आल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत प्रस्ताव मंजूर केला.

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत १६३२.६४ कोटी रुपये आकस्मिक निधीतून पालिकेने खर्च केले आहेत. आणखी चारशे कोटी रुपये वार्ताळ्यामधून आकस्मिक निधीत वर्ग करण्याची विनंती प्रशासनाने स्थायी समितीला केली आहे. मात्र यापूर्वीच्या खर्चाचा हिशेब दिल्याशिवाय चारशे कोटींचा प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली होती. कोविड खर्चासंबंधीचे १२५ प्रस्ताव अपुरी माहिती व घोटाळ्याच्या आरोपांमुळे सत्ताधारी पक्षाने प्रशासनाकडे परत पाठवले आहेत. या खरेदीची आता लेखापरीक्षकांमार्फत चौकशी लावण्यात आली आहे.

दरम्यान, चारशे कोटींचा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्याची उपसूचना भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. या उपसूचनेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने समर्थन दिले. उत्पन्नात मोठी घट होत असताना महापालिकेने ताज हॉटेल, विकासक आदींना मोठी सूट देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महापालिका आगामी तीन वर्षे तूटीत जाण्याची भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली. याबाबत स्पष्टीकरण देताना अर्थसंकल्पात कोविडसाठी तरतूद नसल्याने आकस्मिक निधीतून खर्च करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला असला तरी अद्याप संकट टळलेले नाही. त्यामुळे मार्च २०२१ पर्यंत कोविडसाठी संभाव्य खर्च मंजूर करावा, अशी विनंती अतिरिक्त आयुक्त संजय जयस्वाल यांनी केली.