Join us

ऐरोली-कळवा एलिव्हेटेडसाठी ४२८ कोटी!

By admin | Published: February 26, 2015 10:56 PM

जिल्ह्यातील चाकरमान्यांना अपेक्षित असलेल्या लोकल फे-यांमध्ये प्रभूंनी वाढ केलेली नसली तरीही कळवा ते ऐरोली मार्गासाठी त्यांनी ४२८ कोटींची तरतूद केली आहे.

अनिकेत घमंडी, ठाणेजिल्ह्यातील चाकरमान्यांना अपेक्षित असलेल्या लोकल फे-यांमध्ये प्रभूंनी वाढ केलेली नसली तरीही कळवा ते ऐरोली मार्गासाठी त्यांनी ४२८ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे हा मार्ग साकारल्यावर कल्याण-डोंबिवलीकर थेट पनवेलला रेल्वेने जाऊ शकतील. त्याचा लाभ अडीच लाख प्रवाशांना होणार असल्याने प्रवाशांसाठी ही खुषखबर आहे. मीरा-भार्इंदरच्या हजारो प्रवाशांनाही याचा लाभ घेता येणार आहे. खासदार राजन विचारे यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती, मध्य रेल्वेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम आणि महाव्यवस्थापक अरुणकुमार सूद यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. त्यामुळेच या प्रकल्पासाठी निधीची भरघोस तरतूद झाली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतून रस्ता मार्गे जाणा-या प्रवाशांचा वेळ वाचेल आणि खर्चही वाचेल. हा मार्ग झाल्यावर सध्या कल्याण-ठाणे ही वीस - पंचवीस मिनिटे आणि त्यानंतर ठाणे-पनवेलसाठी पाऊण तासांचा कालावधी लागतो. हा मार्ग झाल्यावर ठाणे स्थानकावर पडणारा सध्याचा ताण ब-याच अंशी कमी होईल. तेथून पनवेलला जाणा-या सध्याच्या सुमारे ५ लाख प्रवाशांपैकी दिड लाख प्रवासी संख्या घटेल अशी अपेक्षाही स्थानक प्रशासनाने व्यक्त केली. सध्या ठाणे स्थानकातून प्रतीदिन साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात. त्या लोंढ्याचे नियोजन करतांना प्रशासनाच्या नाकी नऊ येतात. तसेच कळवा स्थानकालगत कारशेड उपलब्ध असल्याने तेथून गाड्या सोडण्यात येतील. त्याचा लाभ कळवा-मुंब्रा येथील लाखो प्रवाशांना होईल.