नवी मुंबई : ऐरोलीमध्ये ओळखीच्या महिलांकडून व्यावसायासाठी पैसे घेवून तब्बल ४५ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी वर्षा उर्फ मंगल सुरेश पाटील या महिलेला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १८ एप्रीलपर्यंत तिच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. फसवणूक प्रकरणी संशयीत आरोपी म्हणून अटक केलेली वर्षा पाटील घणसोलीमध्ये राहणारी असून शोनाय सारीज नावाचे कपडांचे दुकान चालवत होती. याच परिसरात घरोघरी जावून कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या संगिता रूपनवार या महिलेशी तिची ओळख झाली होती. वर्षाने तिची आर्थीक स्थिती चांगली असल्याचे सांगितले होते. व्यवसाय वृद्धीसाठी तिने संगिता हिच्याकडून पैशांची मागणी केली होती. २८ मार्च ते १६ डिसेंबर २०१६ दरम्यान तीच्याकडून ४५ लाख रूपये घेतले व ते परत दिले नसल्यामुळे रबाळे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. आरोपी महिलेने पैसे परत देताना बनावट नोटा दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी वर्षा हिला १२ एप्रीलला अटक केली आहे. तिला न्यायालयाने १५ एप्रीलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. शनिवारी तीला पुन्हा न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत १८ तारखेपर्यंत वाढ केली आहे. आरोपी महिलेने घणसोली, ऐरोली परिसरातील अनेक महिलांना व्याजाचे आमिष दाखवून जवळ पास दीड कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याची चर्चा आहे. यामुळे पोलिस कसून चौकशी करत आहेत. फसवणुकप्रकरणी वर्षा हिच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर तीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. शीतल शेट्टीयार या महिलेने कर्ज फेडण्यासाठी तीन लाख रूपये दिले होते व त्या बदल्यात मुळ रकमेसह व्याजाची मागणी केल्याचा आरोप केला होता. मुळ रक्कम व व्याजाचे मिळून ४५ लाख इतकी रक्कम होती. (प्रतिनिधी)
व्यवसायासाठी पैसे मागून ४५ लाखांची फसवणूक
By admin | Published: April 17, 2017 3:51 AM