मुंबई - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन धावून आलं आहे. नेहमी सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेक स्वरुपात जमा केली. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली होती. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिला होता आणि महानायक अमिताभ बच्चन यांनीही महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे कौन बनेगा करोडपतीच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. मी पुरग्रस्तांना मदत करणार असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मी रक्कम जमा करणार असून या संकटात लोकांनीदेखील मोठ्याप्रमाणे आपल्या बांधवांना मदत केली पाहिजे असे मी या माध्यमाद्वारे लोकांना सांगत आहे. सोशल मीडियावरून अधिकाधिक लोकांना आवाहन कसे करता येईल, याबाबत माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे, असे बच्चन यांनी म्हटले होते. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. तसेच, अमिताभ यांनी 51 लाख रुपयांची मदत दिल्याचेही जाहीर केले.