मुंबई : किशोरवयीन मुलामुलींचे स्टायलिश पोझ आणि गमतीदार व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेल्या टिकटॉकचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत जागृतीसाठी प्रभावी वापर केला. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जनतेला केलेले संबोधन टिकटॉकवर कोट्यवधींनी पाहिले. याच टिकटॉकने अलीकडेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाच कोटी रुपयांची मदत जमा करत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदविला.टिकटॉक अर्थात बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि.ने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा केली. टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून याबाबतची माहितीही कळवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या एक हजारांवर आहे. या सर्वांना राज्याप्रतिच्या सामाजिक दायित्वाची जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. टिकटॉकच्या प्रेक्षकांना कोविडबद्दल माहिती देत कंपनीने जनजागृतीचे काम केले. कोविड १९ युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक अॅपवर लाइव्ह डोनेशनचीही सुविधा करण्यात आली असून, या मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘टिकटॉक’कडून ५ कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:28 AM