मुंबईत ५० हजार कोटींचा स्क्वेअर फूट घोटाळा
By admin | Published: April 8, 2016 02:33 AM2016-04-08T02:33:32+5:302016-04-08T02:33:32+5:30
मुंबई महापालिकेच्या इमारत विभागातील अधिकाऱ्यांनी ५० हजार कोटी रुपयांचा स्क्वेअर फूट घोटाळा केला असून महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा
मुंबई : मुंबई महापालिकेच्या इमारत विभागातील अधिकाऱ्यांनी ५० हजार कोटी रुपयांचा स्क्वेअर फूट घोटाळा केला असून महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अमित साटम यांनी गुरुवारी विधानसभेत केला. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीची मागणी त्यांनी केली.
मुंबई शहराच्या समस्या, महापालिकेतील घोटाळ्यांसंदर्भात नियम २९३अन्वये झालेल्या चर्चेत सहभागी होताना साटम यांनी आरोप केला की बिल्डिंग प्रपोजल, डीपी, बिल्डिंग डिपार्टमेंट, एसआरए या चार विभागांतील अधिकाऱ्यांचे रॅकेट आहे. त्यात नाईक यांच्यासह महाले, संखे, अमोल दलाल, साखळकर, टांक, राव, राम धस हे अधिकारी आहेत. उपआयुक्त राम धस हे सगळ्यात श्रीमंत अधिकारी आहेत. मागील १५ वर्षे तेच-तेच अधिकारी या विभागांमध्ये फिरत आहेत. विविध मंजुऱ्या देताना या अधिकाऱ्यांनी बिल्डरांकडून प्रती स्क्वेअर फूट पैसे घेतले.
अंधेरी ते वांद्रे या पट्ट्यातील इमारतींच्या ३ हजार ६७४ फाईल्स गायब आहेत. या एकेका फाईलमध्ये किमान पाच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार वेगवेगळ्या मार्गाने करण्यात आला. हीच रक्कम १८ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे साटम म्हणाले. महापालिकेतील इमारत विभागात असलेला भ्रष्टाचार संपविला तर मुंबईत किमान सदनिकांचे भाव चौरस फुटामागे ५०० रुपयांनी कमी होतील, असे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटले होते. तथापि, घोटाळ्यांना नीट पायबंद बसला तर चौरस फुटामागे अडीच ते तीन हजार रुपये इतका भाव कमी होईल, असा दावा साटम यांनी केला. महापालिकेतील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)