CoronaVirus News : कोविड रुग्णालयावर खर्च केले ५३ कोटी रुपये, माहिती अधिकारात उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 06:18 AM2020-07-12T06:18:38+5:302020-07-12T06:19:05+5:30
महत्त्वाचे म्हणजे येथील प्रत्येक बेडमागे २ लाख ५० हजार रुपये खर्च झाला असून, येथे २ हजार ११८ बेड तयार करण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोकळ्या मैदानातही रुग्णालये उभारत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असून, वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदानावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयावर तब्बल ५३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे येथील प्रत्येक बेडमागे २ लाख ५० हजार रुपये खर्च झाला असून, येथे २ हजार ११८ बेड तयार करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला संकुलात हे कोविड रुग्णालय उभारले असून, यासाठी एकूण किती खर्च आला? याबाबतच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्राधिकरणाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती विचारली होती.
प्राधिकरणाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयासाठी एकूण ५३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सिव्हिल आणि इलेक्ट्रिक यावर १४ कोटी २१ लाख ५३ हजार ८२५ रुपये खर्च झाला. दुसऱ्या टप्प्यात २१ कोटी ५५ लाख २५ हजार ३५३ रुपये खर्च झाला. दोन्ही टप्प्यात बेडची संख्या १ हजार ५९ अशी एकूण २ हजार ११८ अशी आहे. पहिल्या टप्प्यात साहित्य आणि उपकरणे यावर ५ कोटी २६ लाख ४७ हजार ४०६ रुपये खर्च करण्यात आले.
- दुसºया चरणात १२ कोटी ६ लाख ३३ हजार २५९ रुपये खर्च करण्यात आले असून, यात आॅक्सिजन, आयसीयू, डायलिसिसचा समावेश आहे. दरम्यान, कोविड १९ अंतर्गत खरेदी, कामे आणि सेवा आपत्कालीन परिस्थिती व तातडीची निकड असल्याने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय तसेच विशेष परिस्थिती व तातडीची खरेदी यानुसार केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.