Join us

डेबिट कार्ड बंद होण्याची भीती घालून ६० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

गावदेवीतील घटना; इंटेरियर डिझायनर महिलेची पोलिसांत धावलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डेबिट कार्ड बंद होण्याची भीती घालून गावदेवीतील ...

गावदेवीतील घटना; इंटेरियर डिझायनर महिलेची पोलिसांत धाव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डेबिट कार्ड बंद होण्याची भीती घालून गावदेवीतील इंटेरियर डिझायनर महिलेला ६० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील कंबाला हिल परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय तक्रारदार यांना २५ जून रोजी अनोळखी व्यक्तीने कॉल करून बँक ऑफ बडोदाच्या मुख्य कार्यालयातून पंकज सिंग बोलत असल्याचे सांगितले. तुमचे बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड बऱ्याच दिवसांपासून वापरात नसल्यामुळे ते ब्लॉक करण्यात आल्याची माहिती दिली. बँक खाते सुरू ठेवायचे असल्यास मोबाईलवर येणारा व्हेरिफिकेशन कोड संदेशात पाठविलेल्या लिंकवर टाकायला सांगितला. महिलेने तो तपशील भरताच भामट्याने एटीएम कार्डवरील सोळा अंकी क्रमांक मिळवला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांत वेगवेगळ्या व्यवहारांत ६० हजार रुपये काढल्याचे संदेश महिलेच्या माेबाईलवर धडकले.

त्यांनी तत्काळ बँकेत धाव घेत याबाबत विचारणा केली, तेव्हा बँकेकडून असा कुठलाही कॉल केला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गावदेवी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

..............................................................

....

गोपनीय माहिती शेअर करू नका...

गेल्या काही दिवसांपासून बँकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणुकीच्या घटना डोके वर काढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.