- पंकज रोडेकर, ठाणेराज्याच्या गृह विभागाकडून राज्यातील विविध पोलीस दलांसाठी गुन्ह्यांच्या तपासकार्यासाठी काही विशेष निधी मिळतो. त्याचप्रमाणे या वर्षाकरिता ठाणे शहर पोलीस दलासाठी गृह विभागाकडून यंदा ६२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. नियमावलीनुसार हा निधी टप्प्याटप्प्याने खर्च करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे विविध युनिट, पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त विभागांना दरमहा प्रति २५ हजार रुपये खर्च दिला जाणार आहे. त्यानुसार, आतापर्यंत १२ लाख रुपये वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.एखाद्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आपल्या खिशातून अथवा संबंधित फिर्यादीमार्फत खर्च करण्याची वेळ ओढवते. अशी वेळ यंदा ओढावू नये, यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी गृह विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार, २०१५-१६साठी ठाणे शहर पोलिसांसाठी ६२ लाखांचा निधी तपासकार्यासाठी मंजूर झाला आहे. तर, ठाणे शहर पोलीस दलासाठी २०१२-१३मध्ये गृह विभागाकडून खर्चासाठी रक्कम मंजूर झाली होती. २०१३-१४मध्ये तपास करण्यासाठी निधीच मंजूर झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आाणि वागळे इस्टेट अशी पाच परिमंडळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहे. त्या-त्या परिमंडळांतर्गत प्रत्येकी पाच-सहा पोलीस ठाणी येतात. अशा प्रकारे ३३ पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या १० शाखा तसेच १० पोलीस उपायुक्त आणि २० सहायक पोलीस आयुक्त कार्यालये कार्यरत आहेत. त्यांना तपासकार्यासाठी निधीतील पैसेवाटप केले जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना स्वत:च्या खिशातून अथवा कोणाकडून घेण्याची वेळ यंदातरी येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.याबाबत दुजोरा देताना इतर राज्यातील पोलीस दलासह ठाणे पोलिसांनाही निधी मंजूर झाला आहे. हा निधी वर्षासाठी मिळाला असून, तो निधी गुन्ह्यांच्या तपासासाठी खर्च केला जाणार आहे. होणाऱ्या खर्चाची माहिती त्या पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखांकडून घेतली जाणार आहे. - व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर
ठाणे शहर पोलिसांना ६२ लाखांचा निधी मंजूर
By admin | Published: August 23, 2015 12:30 AM