रिक्षा-टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनसाठी ७०० रुपये; ३० एप्रिल पर्यंतची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 22:16 IST2025-02-05T22:15:43+5:302025-02-05T22:16:15+5:30
३० एप्रिल नंतर ५० रुपये प्रतिदिन दंड; रिकॅलिब्रेशन अभावी प्रवाशांची लूट

रिक्षा-टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनसाठी ७०० रुपये; ३० एप्रिल पर्यंतची मुदत
महेश कोले
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील ( एमएमआर) मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दारात ३ रुपयांची वाढ करण्यात आले असून नवीन दर १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. नवीन दरानुसार भाडे आकारणी करण्यासाठी मीटरचे रिकॅलिब्रेशन म्हणजे सुधारणा करणे गरजेचे असणार आहे. राज्य परिवहन (आरटीओ) विभागाने यासाठी ७०० रुपयांचे दर ठरविले असून ३० एप्रिल पर्यंत मीटरमध्ये सुधारणा करणे अनिवार्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन पराधिकारणाने ( एमएमआरटीए) एमएमआरक्षेत्रातील सर्व रिक्षा टॅक्सीला नवीन दरानुसार भाडे आकारणी करण्यास परवानगी दिली आहे. मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत दर पत्रकानुसार भाडे अकराणीला करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुमारे ३.५ लाखांपेक्षा अधिक रिक्षा आणि टॅक्सी असून या सर्वांना येत्या ३ महिन्यात मीटर रिकॅलिब्रेशन करून घेणे अपेक्षित आहे. विहित कालावधीमध्ये जर मीटरचे रिकॅलिब्रेशननाही केले तर मात्र १ मे पासून दर दिवशी ५० रुपये दंड आकारण्यात येणार असून तो ५ हजार रुपयांपर्यंत मर्यादित असल्याचे वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिकॅलिब्रेशन अभावी होत आहे प्रवाशांची लूट
नवीन दर लागू करून साधारण ५ दिवसांनी मीटर रिकॅलिब्रेशनचे दर जारी केले आहे . दरम्यान टॅक्सी चालकांकडून प्रवाशांना चुकीचे दर सांगून त्यांची लूट करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. आरटीओने सांगितल्या प्रमाणे दर पत्रकानुसार भाडे घेणे अपेक्षित असले तरी देखील टॅक्सी चालक ३१ ऐवजी ३५ ते ४० रुपयांप्रमाणे भाडे आकारणी करत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
असे केले जाते मीटर रिकॅलिब्रेशन
अधिकृत डीलर मीटरचा जुना सील काढून त्यामध्ये नवीन भाडे दर असलेली अपडेटेड चिप बसवतात. त्यानंतर डीलरकडून लेव्हल १ वर मीटरची चाचणी करून त्याचे सर्टिफिकेट दिले जाते. ते घेऊन आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत - १.५ किमीची रिअल-टाइम रोड टेस्ट केली जाते. यामध्ये पास झाल्यावर रिक्षा टॅक्सिला नवीन दरानुसार मीटरने भाडे आकारणीची परवानगी दिली जाते.