Join us

कोविड काळात जनजागृती मोहिमेवर ७६ लाख रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:07 AM

मुंबई : कोविड काळात १५ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत मुंबईत ...

मुंबई : कोविड काळात १५ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत मुंबईत जनजागृती करण्यात आली. या अभियानाकरिता प्रसारभारतीसह इतर खासगी रेडिओ वाहिन्यांवरून जिंगल्स स्वरूपात संदेश देण्यात आला होता. या मोहिमेसाठी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मुंबईत आरोग्य विभाग व स्वयंसेवकांचे पथक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी व जनजागृती करीत होते. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मुंबईकरांना जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक होते. यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याबरोबरच वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा स्वीकार करण्यासाठी सर्वसामान्य जनमानसात व्यापक स्वरूपात जनजागृती होणे आवश्यक होते. यासाठी ही मोहीम १५ सप्टेंबरपासून राबवण्यात आली.

असा करण्यात आला खर्च

कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्यविषयक शिक्षण देणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे जिंगल्स संदेश २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत प्रसारित करण्यासाठी एकूण ३३ लाख ५१ हजार रुपये एवढे खर्च करण्यात आले, तर १५ ते २४ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत याच खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे ४३ लाख ३३ हजार रुपये याप्रमाणे ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.