मुंबईतील प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या खोदकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी रस्ते खोदकामाला मनाई केली आहे. मात्र, तरीही विनापरवाना रस्त्यांवर खोदकाम करणाऱ्या नागरिकांवर आणि आस्थापनांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून वर्षभरात तब्बल ८ कोटी रुपये दंडाच्या रुपाने वसूल केले आहेत.
शहर आणि उपनगरांतील कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर नेहमीच खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास येते. पालिकेचे विविध विकास प्रकल्प, जलवाहिन्या आणि पर्जन्य वाहिन्या दुरुस्तीच्या कामासाठी खोदकाम सुरू असेल तर तेथे पालिकेतर्फे धूळ नियंत्रण उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणात भर पडणार नाही, याची काळजी प्रशासनातर्फे घेण्यात येते. मात्र, अनेक ठिकाणी विनापरवाना रस्त्याचे खोदकाम होताना दिसते. त्यामुळे शहर विद्रूप होत असून प्रदूषणातही भर पडते. त्यामुळे विनापरवाना खोदकामांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
'सी वॉर्ड'मधून सर्वाधिक २ कोटी ४८ लाख वसूल
१. विनापरवाना खोकदाम करणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई 'सी वॉर्ड'मध्ये करण्यात आली आहे. तिथे ४९० मीटरचे काम करणाऱ्यांकडून दोन कोटी ४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
२. त्यापाठोपाठ 'के' पूर्व विभागात ३८१ मीटर खोदकाम करणाऱ्यांकडून दोन कोटी नऊ लाख रुपये, 'एम पश्चिम' विभागात रस्ते खोदणाऱ्यांकडून १ कोटी ७२ हजार रुपये आणि 'एस' वॉर्डमधून एक कोटी ८३ लाख रुपये वसूल केले आहेत.
३. दक्षिण मुंबीतील अनुक्रमे 'डी' आणि 'ई' विभागांतून ५७ लाख आणि २५ लाख रुपये वसूल केले आहेत. त्यामुळे कारवाई करणाऱ्या पालिकेच्या १३ विभागांनी सात कोटी ९५ लाख दंडाच्या रुपाने वसूल केले आहेत.
या विभागांकडून कानाडोळा'एफ दक्षिण', 'जी दक्षिण', 'जी उत्तर', 'एच पूर्व', 'पी उत्तर', 'आर दक्षिण', 'आर उत्तर', 'एल', 'एम पूर्व' आणि 'एन' तसेच 'टी' या वॉर्डमधून रस्ते खोदणाऱ्यांवर एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे विभागात विनापरवाना खोदकाम होत नाही की कारवाई केली जात नाही याचे उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही.