Join us  

पूरग्रस्तांना ₹१० हजार तातडीने; यंदा रकमेत दुपटीने वाढ, अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 5:14 AM

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी २५ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

मुंबई :  पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीऐवजी यंदा दहा हजार रुपये देण्यात येतील, अशी  घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहांत सोमवारी केली. 

आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी २५ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

मदतीची मागणी

भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघात ढगफुटीने झालेल्या प्रचंड हानीकडे लक्ष वेधले. हजारो एकर शेती खरडून गेली, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरदारे वाहून गेली. सरकारच्या मदतीकडे लोकांचे डोळे लागले आहेत, असे सांगत तातडीची मदत पाच हजार रुपयांऐवजी दहा हजार करण्याची मागणी त्यांनी केली. 

प्रशासनाला निर्देश

धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.  पूरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. 

शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. 

 ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखील पंचनामे त्वरित सुरु करावेत. 

 बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरिता स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. 

टॅग्स :पूरअजित पवार