“राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो”; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:45 PM2024-03-28T13:45:32+5:302024-03-28T13:47:10+5:30

RSS Mohan Bhagwat News: समाज, देश, राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

rss chief mohan bhagwat said if governance is not done well the society also overthrows the king | “राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो”; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे?

“राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो”; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे?

RSS Mohan Bhagwat News: देशभरात लोकसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. उमदेवारी यादी, बैठका, जागावाटप यांवर मोठा खल सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपाकडून ४०० पार असा नारा देण्यात आला असला, तरी विरोधक कडवी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाला २०० जागांवर यश मिळणार नाही, असे दावेही केले जात आहेत. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. 

शाळा-कॉलेज, घर, आणि समाजामध्ये निरनिराळे कार्यक्रम करणाऱ्या संस्था या तीन ठिकाणांहून माणसाला शिक्षण मिळते. त्यामुळे, समाज परिवर्तनात संस्थांची भूमिका फार मोठी आहे, असे सांगताना कुटुंबांच्या संबंधांचे बांध सैल होण्यास सुरुवात झाली आहे. आपल्याकडे टोकाचा जडवाद आणि भोगवाद हेतुपुरस्सर रुजवला गेला. त्यामुळे सुशिक्षित वर्गामध्ये कुटुंबसंबंधांतील विस्कळीतता जास्त दिसते; त्या प्रमाणात अशिक्षित वर्गामध्ये ती दिसून येत नाही. समाजातील आपलेपणा वाढला पाहिजे. समाज, देश, राष्ट्रासाठी मी किती वेळ खर्च करतो, याचा विचार व्हायला हवा, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

राज्यकारभार नीट केला नाही तर समाज राजालाही पायउतार करतो

समाजामुळेच राजा हा राजा होतो. समाजाने त्याला ज्याकरिता कारभार सोपवला, ते त्याने केले नाही, तर त्याला समाज पायउतार करतो. जसा समाज असेल, तसा राजा असतो, देश मोठा व्हायचा असेल, तर समाज मोठा झाला पाहिजे, ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा, तो देश मोठा, असे मोहन भागवत यांनी सांगितले. तसेच सर्व कुटुंबाने एकत्र बसून आठवड्यातून एक दिवस तरी गप्पा मारणे, आपला वंश, परंपरागत रीती अशा गोष्टींवर चर्चा करायला हवी. नवीन पिढीच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन समाधान करावे. पाणी वाचवणे, प्लास्टिक हटवणे, वृक्षारोपण करणे, प्रत्येक जण घरात एवढे करूच शकतो. समरसता, नागरी शिष्टाचार अतिशय आवश्यक आहेत. स्वदेशी म्हणजे फक्त विदेशी वस्तू वापरू नये, असे नाही. विनोबा भावे म्हणतात की, स्वदेशी म्हणजे स्वावलंबन आणि अहिंसा. आम्ही त्यात आणखी एक भर घालतो ते म्हणजे साधेपणा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकमान्य सेवा संघाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित "सामाजिक परिवर्तन - संस्थांची भूमिका" विषयावरील व्याख्यानात मोहन भागवत बोलत होते. लोकमान्य सेवा संघ आणि रा. स्व. संघ या दोन्ही संस्था बऱ्याच बाबतींत समानधर्मी आहेत, डॉ. हेडगेवार हे नागपुरात 'टिळक गटाचे' म्हणून ओळखले जात, असे सांगत त्यांनी दोन्ही संस्थांमधील समानतेवर भाष्य केले. तसेच आपण सर्व गोष्टी आउटसोर्स करतो, ठेका काढतो, जी कामे आपण करायला हवी तीची अपेक्षा ठेका दिलेल्या लोकांकडून करतो. घरासमोर कचरा उचलायला लोक ठेवतो, जे आपले काम आहे त्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. तसे देशाचे काम करायला पण नेत्यांना ठेका देतो आणि अपेक्षा करतो की, त्यांनी सर्व कामे केली पाहिजेत, अशी खंत मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
 

Web Title: rss chief mohan bhagwat said if governance is not done well the society also overthrows the king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.