डॉ. आंबेडकर ग्रंथ समितीवर संघाचा ताबा - हरी नरके
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:18 AM2018-12-25T05:18:07+5:302018-12-25T05:19:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेली आहे, असा आरोप पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेली आहे, असा आरोप पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे.
समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांना त्यांच्या निधनापूर्वी ११ दिवस आधीच समितीवरून हटवण्यात आले होते. प्रा. डोळस यांच्यासह प्रकाश आंबेडकर, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. आ. ह. साळुंखे, बाबा आढाव, जनार्दन चांदूरकर, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. रमेश जाधव, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. दत्ता भगत, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत यांनाही समितीवरून कमी करण्यात आले, असेही प्रा. नरके यांनी सांगितले.
प्रा. नरके यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, डोळस यांच्या जागेवर सुधाकर बोकेफोडे यांची नियुक्ती केली आहे. रा. स्व. संघाशी संबंधित रमेश पांडव, सुनिल भंडगे, वैजनाथ सुरनर, शामराव अत्रे, मिलिंद कांबळे, प्रविण रणसुरे, ईश्वर नंदापुरे, श्यामा घोणसे, संजय साळवे, पी. जी. जोगदंड यांची नवे आंबेडकरी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.