“बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आम्हाला अडचणी येतायत”; RSS चे पालिकेला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 04:05 PM2022-04-13T16:05:37+5:302022-04-13T16:07:07+5:30
सुमारे १९३६ सालापासून संघाची शिवाजी पार्कवर शाखा भरत असून, दोन मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत.
मुंबई: शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे हजारोंचे श्रद्धास्थान. तमाम शिवसैनिक आणि मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे भावनिक विषय आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ शिवाजी पार्कवर असून, दररोज शेकडो जण याला भेट देत असतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळामुळे अडचण निर्माण झाल्याचे म्हटले आहे. याबाबत संघाच्या दादर विभागाने मुंबई महानगरपालिकेला एक पत्र लिहिले असून, यामध्ये दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेसाठीची जागा आहे. संघाच्या दादरमधील विभागामार्फत पालिकेला पाठवलेल्या पत्रानुसार, १९३६ सालापासून संघाची शिवाजी पार्कवर शाखा भरते. १९६७ मध्ये पालिकेने तेथील १७५५ चौरस मीटरचा भूखंड संघाच्या शाखेसाठी भाडेपट्टीवर दिला. २००७ पर्यंत या भूखंडाचे भाडेही शाखेमार्फत भरण्यात आले. मात्र, २००७ पासून आत्तापर्यंत पालिककडे वारंवार मागणी करून देखील या भूभागाचे आरेखन करण्यात न आल्यामुळे त्याचे भाडे थकित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
स्मृतिस्थळामुळे संघाच्या शाखेला अडचण होतेय
संघाने महानगरपालिकेला दिलेल्या पत्रात शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळामुळे संघाच्या शाखेला अडचण होत असल्याचे म्हटले आहे. या पत्रासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादरमधील विभागाने काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे. स्मृतिस्थळामुळे आता आरेखन करणे जिकीरीचे होईल, असे नमूद करण्यात आले आहे. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठवलेले पत्र आता समोर आले आहे.
संघाच्या नेमक्या मागण्या काय?
या पत्रामध्ये दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सदर जागेचे थकीत भूभाडे तातडीने स्वीकारण्यात यावे, अशी पहिली मागणी नमूद करण्यात आली आहे. तर, स्मृतिस्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना-नानी पार्कजवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा, ही दुसरी मागणी करण्यात आली आहे.