मुंबई : देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यातच दिल्लीत कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून या चाचणीला सुरुवात झाली आहे.
या राज्यातून रस्ते महामार्गाने मुंबई आणि राज्यात येणाऱ्या लोकांना ९६ तास आधी कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, ज्या प्रवाशांनी चाचणी केली नाही त्यांची रेल्वेतून उतरल्यानंतर चाचणी घेण्यात येत आहे. चाचणीत आरटी-पीसीआर नेगिटिव्ह रिपोर्ट आल्यास राज्यात प्रवेश मिळणार आहे. त्याचसोबत इतर राज्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांनाही चाचणीशिवाय विमानात प्रवेश मिळणार नाही. राज्य सरकारने विमानाने येणाऱ्या लोकांसाठी कडक निर्बंध आखले आहेत.
पुढील आठ दिवसांत निर्णयसरकारच्या आदेशानुसार जर कोणाकडे प्रवासापूर्वी चाचणी अहवाल नसेल तर त्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणीनंतर जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील. विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे. यानंतर दोन्ही ठिकाणाहून दळणवळण व्यवस्था सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. ३० नोव्हेंबरपूर्वी यावर निर्णय घेण्यात येईल. सध्या राज्यात लॉकडाऊनची नियमावली लागू आहे. जर गुजरातने लॉकडाऊन जाहीर केले तर तेथील नागरिक राज्यात येऊ शकतात, ना गुजरातमध्ये जाऊ शकतात. सध्यातरी केंद्र सरकारसोबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे, यात गुजरातसह ३ राज्यांचा समावेश आहे.
सुप्रीम कोर्टाने माहिती मागवली
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात ४ राज्यांकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. ज्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात यांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, डिसेंबर महिना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा आव्हानात्मक असणार आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयारी करून ठेवली आहे. दिल्लीत रविवारी ६ हजार ७४६ रुग्ण आढळून आले आहेत, तर महाराष्ट्रात ५ हजार ७५३ रुग्ण सापडले आहेत.