मुंबई : शिक्षण हक्कानुसार (आरटीई) प्रवेशासाठी पहिल्या सोडतीतील अद्याप निम्मे प्रवेशही झाले नसल्याने शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेला ४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई विभागातून अद्याप निवड झालेल्यांपैकी ५५ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या सोडतीसाठी मुंबई विभागातून ३,५३२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील १,९४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.आरटीईच्या पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून २६ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करायचे होते. परंतु ही वेळ अपुरी पडत असल्याने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालक व संघटनांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने प्रवेशाला ४ मेपर्यंत मुदतवाढ दिली.
ज्युनिअर केजी आणि प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशासाठी राज्यात ९,१९५ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ७७९ जागा उपलब्ध होत्या. ८ एप्रिलला पहिली सोडत जाहीर झाली. यामध्ये राज्यातून ६७ हजार ७०६ जागांची यादी जाहीर झाली. शाळेजवळील केंद्रात जाऊन कागदपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक होते. मात्र कागदपत्र पडताळणीत पालकांना येणाऱ्या समस्यांमुळे आतापर्यंत राज्यातून फक्त ३५ हजार ६१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले.
प्रवेशासाठी ४ मेपर्यंत मुदतवाढकागदपत्रांच्या पडताळणीतील विलंबामुळे प्रवेश निश्चिती प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील पालक व संघटनांनी केली. त्याची दखल घेत २५ एप्रिलला प्रवेश निश्चिती प्रक्रियेला ४ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनील चौहान यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला.