सीमा महांगडे मुंबई : गरोडिया नगर येथील मॉडर्न इंग्लिश शाळेमध्ये एका पालकाने एकल पालक म्हणून कागदपत्रे प्रवेशासाठी सादर केली. मात्र छाननी समितीच्या सजगतेमुळे पालकांच्या खोट्या कागदपत्रांचे प्रकरण समोर आले आहे. पालिकेच्या छाननी समितीच्या अशा प्रकरणातील जागेवरील प्रकरणे निकाली काढल्याने आरटीई २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी गरजू विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असल्याची प्रतिक्रिया पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत अनेक ठिकाणी बनावट प्रमाणपत्रे, खोटी कागदपत्रे सादर करून प्रवेश मिळविला जात आहे. असाच प्रकार मुंबई पालिका विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळेत घडला. मात्र खरी माहिती समोर आल्यानंतर सदर विद्यार्थ्याला प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती छाननी समितीतील अधिकाऱ्यांनी दिली. आरटीई २५ टक्केअंतर्गत मुंबई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मुंबई विभागातून आतापर्यंत ४४ तक्रारी आरटीई प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यातील २९ तक्रारी या प्रवेशासंदर्भात तर १५ तक्रारी या ऑनलाइन शिक्षणासंदर्भात होत्या.
३१ तक्रारी या पालिका शाळांतील, तर १३ तक्रारी मुंबई उपसंचालक कार्यालयांतर्गत शाळांतील आहेत. दरम्यान, या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जातीचा दाखला नाहीप्रवेश नाकारलेल्या बालकांच्या पालकांकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे काही बालकांचे प्रवेश नाकारले आहेत. जातीचा दाखला नसल्यामुळेही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे.
१९७ प्रवेश निश्चित - आतापर्यंत मुंबई विभागाअंतर्गत प्रतीक्षा यादीतील १९७ प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी १३२८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
गरजूंनाच प्रवेश - आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असणारे हे प्रवेश गरजू विद्यार्थ्यांनाच मिळावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी आमच्या १२ समित्या कार्यरत असून त्या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची छाननी केल्याशिवाय कोणाही विद्यार्थ्याचा प्रवेश आम्ही करत नाही. - महेश पालकर, शिक्षणाधिकारी, पालिका शिक्षण विभाग