लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत कोणत्याही प्रकारे सापत्न वागणूक दिली जाणार नाही तसेच त्यांच्याबद्दल भेदभाव केला जाणार नाही याची दक्षता शाळा प्रशासनाने घ्यावी तसेच विद्यार्थ्यांची शाळेतून गळती होणार नाही याची जबाबदारीही शाळा प्रशासनाची असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांची तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण समितीकडे दाद मागावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील शाळांना दिल्या आहेत.
राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील तब्बल २ हजार १७२ अर्ज दुबार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट झाले. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी ३ लाख ६४ हजार ३९० विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात आले असून, या विद्यार्थ्यांची बुधवारी लॉटरी काढण्यात आली. ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी एनआयसीकडे लॉटरीद्वारे काढण्यात आलेले क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी दिले जाणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेनंतरच विद्यार्थ्यांना १२ एप्रिल रोजी प्रवेशाचे संदेश नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणार आहेत, असे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
आरटीई प्रवेश महत्त्वाच्या तारखा
- प्रवेशाचे एसएमएस मिळण्याचा दिनांक : १२ एप्रिल २०२३
- कागदपत्र पडताळणी करण्याचा कालावधी : १३ ते २५ एप्रिल
- शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश केव्हा घेता येणार : २५ ते ३० एप्रिल
पालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये
- १२ एप्रिल रोजी पालकांना मेसेजेस आल्यानंतर ज्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रे एप्रिलपर्यंत पंचायत समिती, महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
- आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबविली जात असून, प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश क्षमतेएवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. त्यामुळे पालकांनी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल, संस्था यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.