मुंबई : नवीन वर्ष उजाडून दहा दिवस लोटले तरी अद्याप आरटीई पोर्टल सुरू न झाल्याने यंदा आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया होणार का, असा प्रश्न वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांना भेडसावत आहे.
आरटीईच्या पोर्टलवर सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व पाल्यांच्या नोंदणीबाबत अद्याप कोणतीही माहिती प्राथमिक संचालनालयाकडून दिली गेलेली नाही. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळांची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर पडल्यास प्रत्यक्ष प्रवेशही लांबणीवर पडून त्यानंतर शाळांच्या प्रवेशाच्या जागा फुल्ल होणार, अशी चिंता आता पालकांना सतावत आहे.
आपल्या मुलांना चांगल्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळावा या हेतूने पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अनेक पालक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, शिक्षण विभागातील अधिकारी पोर्टल आणि प्रक्रिया सुरू होण्याच्या बाबतीत अद्याप अनभिज्ञ असल्याचे समजते.
प्रक्रियेत बदल पुढील वर्षी शक्य
- नवीन शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्याचा विचार शालेय शिक्षण संचालनालय करीत आहे.
- आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यात वेगवेगळे कायदे राबविले आहेत.
- यापैकी कोणत्या राज्यात चांगली प्रक्रिया राबविली जाते याची माहिती घेऊन ती प्रक्रिया यंदापासून राबवावी की पुढील वर्षापासून याबाबत विचार सुरू असल्याचे कळते.
पोर्टलवरील शाळा नोंदणीसाठी कंपनीकडून टेस्टिंग सुरु असून येत्या आठवड्याभरात प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आवश्यक तो वेळ पालकांना नोंदणीसाठी देण्यात येणार आहे. प्रक्रियेतील काही बदल हे पुढील शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचा विचार असून यावर्षीची प्रक्रिया लवकर सुरू होईल. - शरद गोसावी, संचालक, प्राथमिक संचलनालय