मुंबई : राज्य सरकारकडून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश सुरु झाली असून पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यानी ३१ ऑगस्टपर्यंत शाळांमध्ये प्रवेश निश्चिती करायची आहे अन्यथा त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी मुभा जाणार दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी महापालिका शिक्षण विभागाने ही पालक व्हाट्सअप आणि ईमेल द्वारे प्रवेश निश्चितीसाठी लागणारी कागदपत्रे जमा करू शकतात असे स्पष्ट केले आहे. कोविड १९ ची राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती पाहता आरटीई अंतर्गत प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता हा निर्णय महानगरपालिका शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ (आर टी ई) मधील कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विना-अनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षीप्रमाणे सन २०२०-२१ यावर्षासाठी ‘आर टी ई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट नंतरच्या यादीत वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने पालक विद्यार्थ्यांनी ३१ पूर्वी प्रवेश निश्चिती करण्याचे आवाहन पालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच नॉव्हेल करोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास इ-मेल/व्हॉटसअॅपद्वारे कागदपत्रांच्या प्रती शाळेस पाठविण्याची सुविधा संबंधित शाळांव्दारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यानुसार कागदपत्रे पाठविल्यानंतर दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांनी प्रवेश निश्चित करावा असे पालिका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान पालकांना बोलावलेल्या तारखेला शाळेत जाऊन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा स्तरावरच प्रवेशनिश्चिती करायची आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी पालकांनी गर्दी करू नये, ई मेल , दूरध्वनीद्वारे संपर्क करून प्रवेश करून घ्यावेत असे संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे. मात्र मुंबई विभागात अद्याप काही प्रमाणात लॉकडाऊन कायम असल्याने अदयाप अनेक पालकांनी शाळांना संपर्कच केला नसल्याने प्रवेश रेंगाळले असल्याचे समोर येत आहे.
---------------------------
पहिल्या फेरीत निवड झालेले विद्यार्थी - ५३७१
प्रवेशासाठी तारीख दिलेले विद्यार्थी - ४७०९
प्रवेशासाठी तारीख न दिलेल्या शाळा - ६६२
तात्पुरते प्रवेश दिलेले विद्यार्थी - २३३०
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी -१९६५