मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेली आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची सोडत मंगळवारी जाहीर झाली. मात्र, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या संदर्भातील मेसेजेस १९ मार्च रोजी दुपारनंतर पाठविण्यात येतील, असे आधीच संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सोडत जाहीर झाली असली, तरी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची समितीकडून होणारी पडताळणी प्रक्रिया ही समिती ३१ मार्चनंतरच पार पडेल.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कागदपत्र पडताळणी करणाऱ्या समित्याही शाळांमध्ये ३१ मार्चनंतरच कार्यान्वित होणार असल्याने, आरटीईची पुढील प्रवेश प्रक्रिया त्यानंतरच पार पडेल, अशी माहिती मिळाली आहे.यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत मुंबई विभागात पालिकेच्या १२ आणि मुंबई उपसंचालक कार्यालयांतर्गत ५ अशा एकूण १७ पडताळणी समित्यांमार्फत कागदपत्र छाननी होईल. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश दिले जातात, परंतु काही शाळा कागदपत्रांमध्ये चुका काढून विद्यार्थ्यांच्या प्रवेशास नाकारतात. अशा शाळांना चाप बसण्यासाठी शिक्षण विभागाने या समित्या स्थापन केल्या आहेत. पालकांनी मोबाइलवर प्रवेशाचा संदेश आल्यानंतर शाळांशी संपर्क न करता, प्रथम या केंद्रांमध्ये येऊन कागदपत्रांची छाननी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले.प्रवेश प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी समितीचे सदस्य करतील. अर्जावर अध्यक्षांनी स्वाक्षरी केल्यानंतर अर्ज आॅनलाइन अलॉट केला जाईल. अध्यक्षांच्या स्वाक्षरीचा अर्ज पालकांना दिल्यानंतर तो शाळेत दाखवयाचा आहे. यामुळे समितीने कागदपत्रांची छाननी केल्यानंतर शाळांनी पुन्हा कागदपत्रे बघण्याची आवश्यकता नसेल. मात्र, सध्या शाळा बंद असल्यामुळे या समित्या शाळा सुरू झाल्यानंतरच कार्यन्वित होणार आहेत. यासंदर्भातील सूचना लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्या, तरी यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याची चिन्हे आहेत.
आरटीई सोडत जाहीर, मात्र पडताळणी समित्या ३१ मार्चनंतर कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 7:02 AM