मुंबई : अल्पवयीन मुलीला नाशिकला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका आरटीआय कार्यकर्त्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईचाही सहभाग असल्याचे तिच्या आजीचे म्हणणे आहे. त्यानुसार चार वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी समतानगर पोलिसांनी राजेश माजाळ याला अटक केली आहे. त्याच्यासह दोघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.२०१४मध्ये घडलेल्या या घटनेबाबत आता गुन्हा दाखल करून तक्रार केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. माजाळ हा एनजीओ चालक असून आरटीआयचे काम करतो. पीडित मुलगी निशा (नावात बदल) ही कांदिवली परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. तिच्या आईवडिलांचे पटत नसल्याने ते पाच वर्षांपासून वेगळे राहतात.तिची आई व्यवसायाने नर्स असून बोरीवलीमध्ये एका दाताच्या डॉक्टरकडे काम करते. निशाची आई आणि तिचा मित्र राजेश मांजाळ हे मारहाण करतात असे निशाने तिच्या आजीला काही दिवसांपूर्वी सांगितले होते.२०१४मध्ये शिर्डीला एका खोलीत नेऊन माजाळने अंगावर आइसक्रीम ओतून ते जिभेने चाटत अश्लील चाळे केले, असे निशाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गेल्या महिन्यात २८ आॅगस्टला या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १९ सप्टेंबरला मांजाळला क्राइम ब्रांचच्या कक्ष ११ने ताब्यात घेऊन समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 5:51 AM