मुंबई : माहिती अधिकार कायदा कार्यकर्त्याला परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी मारहाण केल्या प्रकरणाची चौकशी १० जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर त्याबाबत योग्य ती कार्यवाही पोलीस आयुक्तांकडून केली जाणार आहे. माहिती अधिकार कायदा चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन, त्याबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले.विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी जप्त केलेल्या बेनामी रकमेसंदर्भात दाखल गुन्ह्याबाबत ‘आरटीआय’अंतर्गत केलेल्या अर्जावर समाधानकारक माहिती न मिळाल्याने, आरटीआय कार्यकर्ते यशवंत शिंदे यांनी त्याविरुद्ध उपायुक्तांकडे अपील केले होते. त्याबाबत गेल्या माहिन्यात अभिनाश कुमार यांच्या दालनात झालेल्या सुनावणीवेळी शिंदे यांना त्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. मात्र, अभिनाश कुमार यांनी मारहाण केल्याचा इन्कार केला आहे.या प्रकरणी माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली पद्मश्री सुचेता दलाल, डॉल्फी डिसोझा, भास्कर प्रभू, अनिल गलगली, जी. आर. व्होरा व तक्रारदार यशवंत शिंदे यांनी भेट घेतली. त्यावेळी या प्रकरणाचा गुन्हा अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे, त्याचा अहवाल १० जानेवारीपर्यंत आपल्याकडे येईल, त्याच वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे, उपायुक्त यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरा नाही, त्यामुळे तेथील फुटेज मिळण्याची शक्यता नाही. मात्र, कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन संजय बर्वे यांनी दिले. यावेळी सहआयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी उपस्थित होते.
आरटीआय कार्यकर्ता मारहाणप्रकरणी १० तारखेपर्यंत कार्यवाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:33 AM