मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाची मूल्यांकन प्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या परीक्षेत नापास झालेल्या 97 हजार विद्यार्थ्यांनी पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यातील 35 हजार विद्यार्थ्यांचे पेपर चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं समोर आलं असून, माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षीच्या निकालानंतर जवळपास 1.81 लाखांहून अधिक पेपरच्या कॉपी 97 हजार 313 विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या आहेत. आतापर्यंतच्या पुनर्मूल्यांकनाच्या इतिहासातील हा सर्वाधिक आकडा आहे. यावरून हेही स्पष्ट होतं की, मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचा विद्यापीठातील मूल्यांकन प्रक्रियेवर विश्वास कमी होत चालला आहे. गेल्या 3 वर्षांत 2014 ते 2016मध्ये जवळपास 73 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासल्या गेल्याच्या कारणास्तव त्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. त्यामुळे मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. गेल्या वर्षी समर सेशन परीक्षेदरम्यान 49 हजार 596 विद्यार्थ्यांना 85 हजार 068 उत्तर पत्रिकांच्या तपासणीवर साशंकता होती. तेव्हा त्यांनी त्या उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनाला पाठवल्या होत्या. त्यात 16 हजार 739 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं.2017च्या दुस-या सत्रातही जवळपास 47,717 विद्यार्थ्यांनी 76,086 उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. ज्यात 18,254 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. अशाच प्रकारे 2016च्या पहिल्या सत्रातही 44, 441मधील जवळपास 16,934 विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण करण्यात आलं होतं. त्यामुळेच मुंबई विद्यापीठातीलपरीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होत असल्याचं आरटीआय कार्यकर्ता विहार दुर्वेनं सांगितलं आहे. 2014मध्येही जवळपास 80 हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता, आता तो आकडा लाखांच्या जवळपास गेला आहे.
मुंबई विद्यापीठानं 35 हजार विद्यार्थ्यांना केलं अनुत्तीर्ण, भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 3:06 PM