पाच वर्षांत ‘आरटीओ’ने केले ३९ हजारांपेक्षा जास्त लायसन्स रद्द; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 06:20 AM2024-11-27T06:20:20+5:302024-11-27T06:20:48+5:30
मुंबई महानगरातील वाशीमध्ये सर्वाधिक प्रमाण, अंधेरी आरटीओमध्ये एकही लायसन्स रद्द करण्यात आलेले नाही.
मुंबई : राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या पाच वर्षांच्या कालावधी मध्ये मुंबई महानगर प्रदेशातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईतून ३९ हजार ६२७ वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) विविध कारणांसाठी रद्द केले आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई सेंट्रल, बारिवली, वडाळा, पनवेल, वाशी, कल्याण, ठाणे आणि अंधेरी या उपप्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
‘आरटीओ’मार्फत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक ड्रायव्हिंग लायसन्स हे वाशीमध्ये रद्द करण्यात आले असून, त्यांची संख्या १४०२९ इतकी आहे. तर त्या पाठोपाठ पनवेल आणि ठाण्यामध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आल्याचे आरटीओने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तसेच अंधेरी आरटीओमध्ये एकही लायसन्स रद्द करण्यात आलेले नाही.
वाहतूक नियमनासाठी आरटीओकडून शहरांमध्ये आणि टोलनाक्यांवर तसेच हायवेवर वाहनांची तपासणी सुरू असते. तपासणीदरम्यान वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. काहीवेळा गंभीर स्वरूपाच्या घटनांमध्ये किंवा वारंवार एकाच प्रकारच्या नियमाचे उल्लंघन केल्यास आरटीओकडून त्यांचे परवाने रद्द करण्यात येत असतात. यामध्ये ड्रिंक अँड ड्राइव्ह, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापराने, मालवाहू गाड्यांमध्ये जास्त सामान भरणे, अधिकची प्रवासी वाहतूक, मालवाहतूक गाडीमधून प्रवासी वाहतूक करणे, ओव्हर स्पीडिंग, सिग्नल जंपिंग, वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे, अशा विविध कारणांसाठी लायसन्स रद्द करण्यात आले असल्याची माहिती आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आरटीओ कार्यालय रद्द लायसन्स
ताडदेव ३४१३
वडाळा ९५६
ठाणे ८६७०
वाशी १४०२९
कल्याण ८६७
पनवेल ९४८१
बोरिवली ४४
(एप्रिल ते ऑक्टोबर - २०२४)