चेतन ननावरे
मुंबई - मुंबईतील मुजोर रिक्षा व टॅक्सींविरोधात आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेत पहिल्याच महिन्यात ४६० चालकांविरोधात परवाने रद्द करण्याची कारवाई झाली असून त्यातील ३००हून अधिक चालकांचे परवाने सुनावणीअंती कायमस्वरूपी रद्द केले आहेत. याशिवाय रिक्षा व टॅक्सी चालकांकडे वाहन परवाना किंवा वाहन चालक बिल्ला नसल्याने एक हजाराहून अधिक रिक्षा व टॅक्सींचे परमिट एक ते तीन महिन्यांसाठी रद्द केल्याची माहिती आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यासह वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरात सुरू झालेली ही मोहिम आता मुंबई शहर आणि उपनगरात राबवण्यात येणार आहे. महिन्याभरात झालेल्या कारवाईत एकूण २ हजार ४६८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात भाडे नाकारल्यामुळे ४६० रिक्षा व टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या चालकांविरोधात तूर्तास सुनावणी सुरू असून दोषी आढळलेल्या ३००हून अधिक चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले.
भाडे नाकारण्यासह जादा भाडे मागणाºया २०, तर जादा प्रवासी वाहतूक करणाºया १८१ चालकांविरोधात परिवहन विभागाने कारवाई केली आहे. दरम्यान, परिवहन विभागाने इतर नियमांची कडक अंमलबजावणी होतेय का? याची पाहणी सुरू केली आहे. त्यात रिक्षा व टॅक्सी चालकाचा गणवेष, बिल्ला, वाहन चालक परवाना धारण केला आहे का? याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १ हजार ४६६ वाहनांचे परमिट एक ते तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
१ हजार १५० परवाने जप्त
प्रवाशांच्या तक्रारीवरून आरटीओने केलेल्या कारवाईत एकूण १ हजार १५० वाहन चालकांचे वाहन परवाने जप्त केले आहेत. यासह १२४ रिक्षांवरही जप्तीची कारवाई केली आहे. वांद्रे आणि कुर्ला परिसरातील या कारवाईनंतर आरटीओने आपला मोर्चा मुंबईभर वळवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चाप लावण्यासाठी ही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.