आरटीओ कार्यालय होणार ‘कॅशलेस’
By admin | Published: June 20, 2017 02:42 AM2017-06-20T02:42:26+5:302017-06-20T02:42:26+5:30
शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना काढणे, शिकाऊ-पक्के लायसेन्स काढणे, पत्ता-नाव बदलणे या कामकाजासाठी सारथी ४.० प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना काढणे, शिकाऊ-पक्के लायसेन्स काढणे, पत्ता-नाव बदलणे या कामकाजासाठी सारथी ४.० प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या आॅनलाइन प्रणालीमध्ये आॅनलाइन शुल्क भरण्याची व्यवस्था आहे. परिणामी, आरटीओ कार्यालयातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांना आॅनलाइन शुल्क भरा, असे आवाहन मुंबई मध्य प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
आरटीओ कार्यालयाने आॅनलाइन प्रक्रियेअंतर्गत ‘सारथी ४.०’ ही प्रणाली विकसित केली. यात आरटीओतील बहुतांशी कामांसाठी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून नागरिकांची रांगेपासून सुटका केली आहे. त्यानुसार वाहन परवाना काढणे, शिकाऊ-पक्के लायसेन्स काढणे यांसारख्या वेळखाऊ क्लिष्ट प्रक्रियादेखील सोप्या करण्यात आल्या आहेत.
शिवाय नागरिकांची दलालांपासून सुटका करण्यासाठी आॅनलाइन शुल्क भरण्याचीदेखील व्यवस्था आहे. त्यामुळे नागरिकांनी दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आॅनलाइन शुल्क भरावे आणि आपले पैसे, वेळ वाचवावा, असे आवाहन मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे यांनी केले आहे.