Join us

आरटीओ अधिकाऱ्याला मिळाली पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोटार वाहन विभागात (आरटीओ) सेवाज्येष्ठतेतील अधिकाऱ्याला डावलून दुसऱ्या अधिकाऱ्याला पदोन्नती देण्यात आली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोटार वाहन विभागात (आरटीओ) सेवाज्येष्ठतेतील अधिकाऱ्याला डावलून दुसऱ्या अधिकाऱ्याला पदोन्नती देण्यात आली होती. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले हाेते. त्यानंतर साहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांना रत्नागिरी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली.

प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) पदोन्नतीसाठी १५ जणांची यादी तयार आहे, मात्र सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असणाऱ्या १४ अधिकाऱ्यांना डावलून नंदकिशोर पाटील यांना पदोन्नती दिली होती. राज्यात पदोन्नतीसाठी अनेक जण पात्र असताना एकमेव पदोन्नतीचा आदेश काढण्यात आला होता. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

यासंदर्भात १७ एप्रिल रोजी ‘चौदा अधिकाऱ्यांना डावलून पाटील यांना पदोन्नती’ या मथळ्याखाली ‘लाेकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर हालचालींना वेग आला. नुकतीच साहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांना रत्नागिरी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली.

* ऑगस्टपर्यंत १६ पदे होणार रिक्त

प्रादेशिक परिवहन विभागात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाच्या १६ जागा ऑगस्टपर्यंत रिक्त होणार आहेत. यामध्ये सध्या ५ पदे रिक्त आहेत. ७ पदांची पदोन्नती होणार आहे. तर चार अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांची जागा रिक्त होईल.

.........................

पाच अधिकाऱ्यांना एका दिवसाची पदोन्नती

प्रादेशिक परिवहन विभागात अनेक पदे रिक्त असून, त्यावर पात्र अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी पदोन्नतीसाठी यादी तयार असूनही टाळाटाळ केली जात होती. तीन साहाय्यक परिवहन अधिकारी आणि दोन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सेवानिवृत्तीच्या तोंडावर एका दिवसासाठी पदोन्नती मिळाली होती. अर्थकारणामुळेही पदस्थापनेचे आदेश निघत नाहीत, अशी आरटीओ विभागात चर्चा आहे.