आरटीओ अधिकाऱ्याला एकाच दिवसासाठी मिळाली पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:32+5:302021-09-02T04:14:32+5:30
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) विविध पदांवरील बदल्या आणि बढत्या ९ आणि १० ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. ...
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) विविध पदांवरील बदल्या आणि बढत्या ९ आणि १० ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याच्या बढतीचे आदेश परिवहन विभागाने नुकतेच काढले आहेत. बढतीच्या दुसऱ्याच दिवशी तो अधिकारी सेवानिवृत्त होणार आहे.
आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत चिंचोळकर यांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून एक दिवसासाठी पदोन्नती मिळाली आहे. त्यांना ऑगस्ट २०२० मध्ये पदोन्नती देणे अपेक्षित होते; पण मिळाली नाही. इतके दिवस पदोन्नती का प्रलंबित ठेवली हा प्रश्न आहे. तसेच राज्यात आरटीओ विभागात ४० बढत्यांची यादी तयार आहे. यामध्ये मोटार वाहन निरीक्षक ते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी -२७, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी - ६, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ते प्रादेशिक परिवहन अधिकारी ७ जागांसाठी पदोन्नती निवड समितीने यादी तयार केली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. जाणीवपूर्वक यामध्ये चालढकल केली जात असून, त्यामुळे अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे.