मुंबई : साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (असिस्टन्ट आरटीओ) राजेंद्र नेरकर यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) तब्बल 84 लाखांची रोकड सापडली. ज्ञात स्रोतापेक्षा नेरकर यांनी तब्बल 99 लाखांची मालमत्ता गोळा केल्याचे एसीबीच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्यावरही एसीबीने गुन्हा नोंदवला आहे.
नेरकर अंधेरीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात नेमणुकीस होते. एप्रिल महिन्यात एसीबीने त्यांना दीड हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. या कारवाईत त्यांच्यासोबत जयप्रकाश साळवी या खासगी व्यक्तीलाही गजाआड करण्यात आले होते. एसीबीने नेरकर यांच्या मालमत्तेबाबत तपास सुरू केला.
या तपासात नेरकर यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी छापा घालण्यात आला. छाप्यात नेरकर यांच्या घरात तब्बल 84 लाखांची रोकड सापडली. या पैशांबाबत नेरकर किंवा त्यांची पत्नी प्रतिभा समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. पुढील तपासात नेरकर व प्रतिभा यांच्या नावे 1 कोटी 16 लाखांची संयुक्त स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी 99 लाखांची मालमत्ताही नेरकर यांनी अज्ञात स्रोतांतून गोळा केल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती एसीबीने दिली.
या प्रकरणी नेरकर यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तर नेरकर यांना गुन्ह्यात सहकार्य केल्याबद्दल प्रतिभा यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे एसीबीने सांगितले. (प्रतिनिधी)