Join us

आरटीओ ‘आॅनलाइन’ अर्ज प्रक्रिया सुरू, १६ सेवांकरिता आॅनलाइन अर्जाची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 6:13 AM

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील (आरटीओ) भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, मुंबई मध्य आरटीओने कामकाज प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील (आरटीओ) भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, मुंबई मध्य आरटीओने कामकाज प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओमधील लागणारी नागरिकांची रांग कमी करण्यासाठी १६ सेवांकरिता आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधांमध्ये कर भरणे, वाहन हस्तांतरण या सुविधांचादेखील समावेश आहे.आरटीओ कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी नागरिकांच्या नेहमीच रांगा लागतात. अशा वेळी काम लवकर करून देण्याचे आमिष दाखवून, आरटीओ कार्यालयाजवळील एजंटद्वारे नागरिकांकडून पैसे उकळण्यात येतात, तर अर्ज भरून देण्यासाठीदेखील नागरिकांकडून पैसे घेण्याचे प्रकार आरटीओत सर्रास घडतात. याबाबत तक्रारीदेखील आरटीओ कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. यामुळे एजंटला आळा घालण्यासाठी मुंबई (मध्य) आरटीओने १६ सेवांकरिता आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे. यात वाहन हस्तांतरण, वाहन चालकांचा मृत्यू झाल्यानंतर वारसाचे वाहन हस्तांतरण, लिलावातील वाहन विक्रीची नोंद घेणे, पत्ता बदलणे, भाडे कराराची नोंद करणे, कराचा भरणा करणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, योग्यता प्रमाणपत्र तपासणीची आॅनलाइन वेळ ठरविणे, वाहनात बदल करणे, नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहन प्रकाराचे रूपांतर करणे, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे आणि व्यवसाय प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे या सेवांचा समावेश आहे.या सुविधेसाठी परिवहन (डॉट) जीओव्ही (डॉट) इन या संकेतस्थळावर भेट देऊन वाहन प्रणालीवर अर्ज करावेत. हा अर्ज आॅनलाइन भरून त्याची प्रिंट काढावी व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित विभागात सादर करावे. संबंधित अर्जाचे शुल्कही आॅनलाइन भरण्याची मुभा देण्यात आली असून, त्याची पावती सादर करणे आवश्यक राहणार आहे, अशी माहिती मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर यांनी दिली.